विद्रोही तुकाराम - Vidrohi Tukaram
Material type:
- 9788192728377
- G-74
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
Books | Dina Bama Patil Library & Study Room | ISSUE-RETURN | G-74 (Browse shelf(Opens below)) | Available | Library | DBPL-001806 |
वयाच्या विशीत असलेल्या तुकारामांना भांबनाचाच्या डोंगरावर साक्षात्कार झाला, हे खरे आहे. पण हा साक्षात्कार आध्यात्मिक स्वरूपाचा नव्हता, तर सामाजिक न्यायाच्या स्वरूपाचा होता. या साक्षात्कारानंतर त्यांनी पहिले पाऊल उचलले, ते वडिलांनी लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणीच्या डोहात बुडवण्याचे होय, त्यांनी हे कृत्य संसाराला विटल्यामुळे नव्हे, तर संसाराला चिकटणारा शोषणाचा घटक छाटून टाकण्यासाठी केले. अन्नान्न दशा झाल्यामुळे ते ईश्वरभक्तीकडे वळले, हे काही लेखकांचे म्हणणेही खरे नव्हे. कारण, मी जनार्दनाकडे आलो, ते काही अन्नाला महाग झालो होतो म्हणून नव्हे, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. मी वेदांचा अंकित नाही, भेदभाव सांगणारा वेदांचा भाग गाळून उरलेला भाग मी प्रमाण मानतो, सर्वांच्या ठिकाणी समत्व पाहणे हे ब्रह्माचे स्वरूप न जाणणारा पंडित दुराचारी होय, अशी भूमिका त्यांनी घेतली. सर्वांचे चर्म व मांस समान असताना भेदभाव कशाच्या आधारे करायचा, वाण्याच्या दुकानातून गूळ घ्यायचा असेल तर त्याची जात व कूळ कशाला विचारायचे, गावाचा मोकाशी हलक्या जातीतील असला तर त्या कारणाने त्याची आज्ञा मानायची नाही काय, असे प्रश्न त्यांनी विचारले. महार व्यक्तीला स्पर्श झाल्यामुळे ज्याला राग येतो तो काही खरा ब्रह्मज्ञानी ब्राह्मण नव्हे, त्याने देहान्त प्रायश्चित्त घेतले तरी त्याचे पाप फिटत नाही, असे त्यांनी म्हटले.
त्यांनी सोवळ्या ओवळ्याच्या परंपरागत कल्पना नाकारल्या आणि जो परद्रव्य व परनारी यांच्या बाचतीत सोवळा असतो तोच खरा सोवळा, अशी नैतिक कसोटी सांगितली. जो जानवे व शेंडी यांच्याबरोबरचा संबंध तोडेल, त्याला कसलीही बाधा होणार नाही, असे म्हटले. विधिनिषेध, यज्ञ, श्राद्ध, पूजा, भविष्यकथन, शुभाशुभ, नवस, कौल, योग, समाधी, उपवास, तीर्थयात्रा, वनवास, गुहेतील ज्ञान, संन्यास, मोक्ष यांचे परंपरागत स्वरूप नाकारून त्यांच्यापेक्षा शुद्ध भावना व शुद्ध आचरण यांना खरे महत्त्व असल्याचे सांगितले. त्यांचा ईश्वरही पारलौकिक मूल्यांवर नव्हे, तर माणूसकीवर आधारलेला होता. रंजल्या-गांजल्या लोकांना जो आपले म्हणतो, तो खरा साधू आणि देव अशा साधुजवळच राहतो, असे त्यांनी म्हटले, देवपूजा करताना असे संत घरी आले असता देवांना बाजूला सारून या संतांची पूजा करावी, असे त्यांनी लोकांना सांगितले.
थोडक्यात म्हणजे समाजव्यवस्थेला न्यायाचे अधिष्ठान देऊन तिचे निर्मलीकरण करण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस युद्ध केले आणि काही तत्त्वांसाठी, काही मूल्यांसाठी स्वतःच्या हातांनी एका प्रबळ समाजाच्या वैराचा ज्वालामुखी स्वतःच्या आवर ओढवून घेतला ।
There are no comments on this title.